मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यानंतर आज (18 फेब्रुवारी) पुन्हा एकदा राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील 9 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली साखर आयुक्त, पुणे येथे झाली आहे.
तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंदकुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. तर कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांची बदली महिला आणि बालविकास आयुक्त, पुणे येथे झाली आहे.
समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांची नेमणूक निवासी आयुक्त आणि सचिव म्हणून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर महापालिका आयुक्तपदी, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची बदली आदिवासी विकास आयुक्त, नाशिक येथे तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.
