मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह विभागाने सुरक्षेचा गंभीर धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या 20 आमदारांचा समावेश असून, गृह खात्याच्या या निर्णयामुळे हे आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात छुपा संघर्ष सुरू असल्याची चर्चा गत काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर उपरोक्त प्रकार घडला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह विभागाने राज्यातील सर्वच आमदार व प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सुरक्षेचा गंभीर धोका नसणाऱ्या आमदार व नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गृह खात्याच्या या निर्णयाचा फटका सत्ताधारी शिवसेनेच्या 20 आमदारांना बसला आहे. यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे. त्यांनी ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकल्याचीही चर्चा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केल्यानंतर शिंदेगटाच्या 40 आमदार व 12 खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यातील काही आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा होती.
पण आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ज्या आमदार व खासदारांच्या सुरक्षेचा धोका पूर्वीपेक्षा कमी झाला आहे, त्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. गृह खात्याने केवळ शिंदे गटातील नेत्यांच्याच सुरक्षेत कपात केली नाही, तर सरकारने राष्ट्रवादी व भाजपच्या काही बडे नेते व आमदारांचीही सुरक्षा कमी केली आहे.
तानाजी सावंतांचा लवाजमा इतिहासजमा
गृह खात्याच्या या निर्णयामुळे शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारी लवाजमा इतिहासजमा झाला आहे. सावंत यांनी मंत्री असताना आपल्या सुरक्षेसाठी 48 पोलिस कर्मचारी व तीन वाहने नियुक्त करून घेतली होती. पण आता त्यांचे मंत्रिपद गेल्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आता केवळ एक सुरक्षा रक्षकच त्यांच्या दिमतीला असेल.
मधल्या काळात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांचा फौजफाटा 15 कर्मचाऱ्यांपर्यंत कमी केला होता. पण सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत दाव टाकत पुन्हा आपल्या सुरक्षेत वाढ केली होती. पण आता तानाजी सावंत यांची सुरक्षा व्यवस्था काढून त्यांना आमदार म्हणून केवळ एक सुरक्षा रक्षक देण्यात आला आहे.
