मुंबई(DSNews24/किरण पुरी) स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सतिश गणपत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष प्रणेते मनोजभाई संसारे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र सतिश देशमुख यांना देण्यात आले आहे. गेल्या वर्षांपूर्वी सतिश देशमुख यांच्यावर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
जबाबदारी मिळताच सतिश देशमुख यांनी पिंपरी चिंचवड शहरात धडाकेबाज कामगिरी बजावली होती. तसेच पक्षाची योग्य भूमिका मांडून जनसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. तर पक्षाचे संघटन देखील वाढवले. याच कार्याची पक्षाचे संस्थापक मनोजभाई संसारे यांनी दखल सतीश देशमुख यांची थेट पुणे जिल्हाध्यक्षपदी बढती देत जबाबदारी सोपवली. विशेषतः पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदीही सतिश देशमुख यांनाच कायम ठेवण्यात आले आहे.
नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, महामानव प.पूज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ३० सप्टेंबर १९५६ रोजी जाहीरनाम्याद्वारे घोषीत केलेल्या सामाजिक व राजकीय विचारांवर आधारित असलेल्या रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या पक्षाच्या महाराष्ट्र प्रांतातील पुणे जिल्हाध्यक्षपदी या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी आपणास बहाल करताना स्वाभिमान व आनंद वाटत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे ध्येय, धोरणे व उद्दिष्टे यानुसार सर्व जाती धर्माचे, बोली – भाषिक नागरिकांना, विशेषतः बहुजन दलित, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांचा मुलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रामाणिक व निस्वार्थीपणे कार्यरत राहावे. तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात व न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी समग्र लढा उभारून पक्षाचा जनाधार वाढवावा.
आजतागायत आपण केलेली सामाजिक, राजकीय वाटचाल लक्षात घेऊन पक्ष संघटनेच्या वतीने आपल्यावर पुर्णतः विश्वास ठेवून महत्वपूर्ण जबाबदारी आपणास देण्यात आली आहे. पक्षाचे ध्येय धोरण व उद्दिष्टे यांच्या अधीन राहून नियमाप्रमाणे प्रामाणिक, निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करणे तसेच आपल्या अधिकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे याचे संपूर्ण अधिकार आपणांस प्रदान करीत आहेत.
