पक्षाने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक पाथर्डीतून लढवणार, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आता पंकजा मुंडे परळीतून लढणार की पाथर्डीतून अशी चर्चा रंगू लागली आहे. तर कालच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या बहीण- भावातील अंतर कमी झाले म्हटल्याने, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताह सुरू होता. यावेळी कार्यक्रमास भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.
यावेळी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. यामुळे बहीण- भाऊ यापुढे एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार नाही की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून 2014 सालापासून मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत. त्यांचे पती दिवगंत राजीव राजळे हे आमदार म्हणून निवडून आले होते. यामुळे भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले आहे की, कोणी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवावी, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे.
