सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १५ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना घेऊन भाजपबरोबर सत्ता स्थापन करतील, असा दावा काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीटद्वारे केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय बोलणार?” असे विधान करत थेट उत्तर देणे टाळले होते. त्यामुळे अजित पवार भाजपबरोबर जाणार की नाही? याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील तुम्ही भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आता सांगता येणार नाही, असे म्हणत थेट प्रतिक्रिया देणे शरद पवारांनी टाळले आहे.
तसेच महाविकास आघाडी म्हणून आम्ही सध्या तरी एकत्र आहोत, असेही पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य सत्तांतराबद्दल संशय आणखी बळावला आहे.
