संगमनेरमध्ये मध्यरात्री आ. अमोल खताळांच्या घरावर मशाल मोर्चा… 

संगमनेर (DSNews24 ) राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज माफी, शेतमालाला हमीभाव यासह इतर मागण्यांना घेऊन ११ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रहारचे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रदिप थोरात आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या घरावर मशाल मोर्चा काढला होता.

दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर आ. अमोल खताळ यांनी तात्काळ निवेदन स्विकारत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन आंदोलकांनी दिले. तसेच शेतकरी तसेच दिव्यांगाच्या जिवंत आणि ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील केले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव तसेच दिव्यांग बांधवांना ६०००/- मासिक अनुदान द्यावे या मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन केलेले होते.

त्यास शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेने देखील जाहीर पाठिंबा दिला होता. त्याच अनुषंगाने प्रहार तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्वच सदस्य तसेच पदाधिकारी यांच्याबरोबरच शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या मशाल मोर्चात सहभाग नोंदवत शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी रात्री १२.०० वाजता सर्वच लोकप्रतिनिधींना मशाल मोर्चाद्वारे निवेदन दिले.

Leave a Comment