अहिल्यानगर – बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटेसह चौघांना अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, त्यांना शुक्रवारी श्रीगोंदा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची (दि. १६) पोलीस कोठडी सुनावली आहे.
चेअरमन सुरेश कुटे, व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जामखेड मधील ठेवीदारांचे सुमारे ४५ कोटी रूपये अडकले आहेत. याप्रकरणी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळासह १९ जणांविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात ७ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच श्रीरामपूर येथील ठेवीदारांचेही पैसे ‘ज्ञानराधा’ मध्ये अडकले असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात २९ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही गुन्हे तपासकामी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहेत.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना बीड पोलिसांना अटक केली होती. त्यांना मध्यंतरी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले होते. दरम्यान, सध्या ते चौघे बीड पोलिसांच्या ताब्यात होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या चौघांना बीड पोलिसांच्या ताब्यातून घेतले आहे. त्यांना सध्या जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस अंमलदार नियाज शेख, मुकेश शिरसागर, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
