संगमनेर (DSNews24/किरण पुरी) अगदी लहान पणापासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ काम करून पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेत तालुक्यातील पठार भागात पक्ष बळकट करण्यासाठी युवा नेते गुलाबराजे भोसले चांगलेच सक्रिय झाले होते. मात्र महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष तालुका व स्थानिक पातळीवर साधी किंमत देत नसल्याने गुलाबराजे भोसलेंसह इतर नेते नाराज झाले होते. तसेच कॉंग्रेसने कधीच आघाडीचा धर्म पाळला नाही. कोणत्याही विकासकामांचे उद्घाटन व शुभारंभाला कॉंग्रेसचे नेते बोलवत नव्हते. महाविकास आघाडी झाल्यापासून कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला कोलून दिल होत. ठाकरे गटाला कॉंग्रेसचा कधीच फायदा झाला नाही, याच कारणांमुळे गुलाबराजे भोसले यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत थेट महाविकास आघाडीतूनच बाहेर पडले होते.
भाजपमधील प्रवेशानंतर सहा महिन्यांतच दाखवली कामाची पावती
दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गुलाबराजेंनी हा निर्णय घेतल्याने पठारभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०२४ रोजी साकूर येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांची जाहीर सभा आयोजित केली होती. याच सभेत गुलाबराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता. त्यानंतर गुलाबराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पठार भागात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात केली. सहा महिन्यांतच गुलाबराजे भोसले यांनी कामाची पावती दाखवली अन् आज भाजपने तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
दरम्यान गुलाबराजे भोसले यांचा राजकीय प्रवास बघितला तर लहानपणापासूनच राजकारणाची आवड त्यांना आहे. मोर्चा, आंदोलन, सभा या ठिकाणी सहभाग नोंदवत आपल्या भाषणातून लोकांची मने त्यांनी जिंकली.
असा आहे राजकीय प्रवास
शिवसेना शाखा प्रमुख, रमेश फिरोदिया महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केले. तसेच शिवसेना गण प्रमुख, युवा सेना तालुका व उप तालुकाप्रमुख, शिवसेना संघटक, त्यानंतर आता भाजप तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.
