साकूर गटाचा सदस्य कोण होणार? “ही” नावे चर्चेत, अशी होऊ शकते लढत…

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने 2022 पासुन रखडलेल्या निवडणुका या सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये पार पडणार असल्याची शक्यता आहे. तसेच प्रशासन देखील त्या पद्धतीने कामाला लागल्याचे दिसुन येतय. गट, गण व प्रभाग रचना कशी असणार? आरक्षण कोणते असेल? ई.बाबी अजुन स्पष्ट होणे बाकी असले तरी संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा मात्र जोरदार सुरु झालीय. याबाबत DSNews24 ने संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाचा खास आढावा घेतलाय.

साकूर गटात २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत जि.प.सदस्य पदासाठी महिला आरक्षण होते, तर २०१२ मध्ये हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला होता. २०१२ साली या गटात राष्ट्रवादीकडुन बाळासाहेब कोंडाजी खेमनर विरुद्ध काॅंग्रेसचे सत्यजीत तांबे अशी जोरदार लढाई झाली होती. यामध्ये समोर विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे हे बलाढ्य उमेदवार असतानाही सर्वसामान्य उमेदवार असणारे बाळासाहेब खेमनर यांनी चांगली मते मिळवली होती व फार कमी मतांच्या फरकाने सत्यजीत तांबे विजयी झाले होते.

यानंतर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसकडुन जांबुत बु येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. तुळशीराम शेटे यांच्या सुन सौ.मिराताई शेटे तर भाजपकडुन कौठे मलकापुर येथील माजी जि.प.सदस्य भिमराज गिते पा.यांच्या भावजयी व श्री.हरिभाऊ गिते पा.यांच्या पत्नी सौ.हिराबाई हरिभाऊ गिते पा. अशी लढत झाली. यामध्ये काॅंग्रेसकडुन सौ. मिराताई शेटे या विजयी झाल्या व नंतर त्यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदाचीही पहिल्याच टर्म मध्ये संधी मिळाली. तसेच त्यावेळी साकूर गणात जांभुळवाडीच्या काॅंग्रेसच्या विद्यमान सरपंच सौ.सुनिता अण्णासाहेब कुदनर यांनी भाजपकडुन निवडणुक लढवली होती.

तर शिंदोडी येथील सौ.संगिता उत्तम कुदनर यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला होता, तर पिंपळगाव देपा गणामध्ये भाजपकडुन बुवाजी खेमनर, काॅंग्रेसकडुन किरण मिंडे तर राष्ट्रवादीकडुन किरण भागवत अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये काॅंग्रेसकडुन किरण मिंडे विजयी झाले होते. या निवडणुकीत विरोधकांमध्ये उमेदवारी बाबत एकमत न झाल्याने किरण भागवत व अमृता कोळपकर यांनी राष्ट्रवादीकडुन उमेदवारी केली व यामुळे विरोधी मतांचे विभाजन झाल्यामुळे व किरण भागवत यांचा वरील पठारावर प्रभाव असल्याने भाजपच्या दोन्ही पं.स. व जि.प.उमेदवाराला किरण भागवत यांच्यामुळे काही प्रमाणात फटका बसला व विरोधकांना एकजुट नसल्यामुळे विजय मिळवता आला नाही.

तसेच यावेळी अजुन पं.स. गणरचना व गट रचना कशी असणार, आरक्षण ई.बाबत स्पष्टता नसली तरी इच्छुकांनी मात्र आपल्यालाच जागा मिळेल असे गृहीत धरुन तयारी सुरु केल्याचे दिसुन येते. यंदा संगमनेर विधानसभेत जायंट किलर आमदार अमोल खताळ यांनी काॅंग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव केल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे, तर सर्व तालुक्यात विरोधी परिवर्तनाची लाट असतानाही साकूर गटाने मात्र 1300 मतांची आघाडी दिल्याने साकूर गट हा काॅंग्रेस कार्यकर्त्यांसाठी आजही अनुकुल असल्याचे काॅंग्रेसच्या नेत्यांचे ठाम मत आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणूकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार की घटक पक्ष स्वतंत्र लढणार याबाबतही अजुन स्पष्टता नसली तरी साकूर गटात मात्र ही लढाई थोरात समर्थक विरुद्ध विखे समर्थक अशीच असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होईल यात कोणतीही शंका नाही.

काॅंग्रेसकडुन जि.प.साठी साकूर येथील बाळासाहेब भाऊसाहेब सागर, मांडवे येथील भगवान उद्योग समुहाचे आदिक खेमनर, बिरेवाडी येथील बालाजी उद्योग समुहाचे बाबासाहेब भोसले यांच्या सह माजी सभापती सौ.मिराताई शेटे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर आ.अमोल खताळ यांच्या विजयाने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह व काॅंग्रेस मध्ये साकूर गटात सुरु झालेले अंतर्गत नाराजी नाट्य याचे मोठे आवाहन काॅंग्रेस उमेदवारासमोर असणार आहे.

भाजपकडुन नुकतेच विधानसभा निवडणुकीपुर्वी उबाठा”तुन भाजपमध्ये प्रवेश केलेले व सध्या भाजप तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविलेले बिरेवाडी येथील गुलाबराजे भोसले हे स्वत: जि.प.निवडणुक लढविण्यासाठी प्रचंड इच्छुक असुन त्यांनी तशी मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. किंबहुना जि.प.निवडणुक लढवण्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. त्यांच्याबरोबर कौठेमलकापुर येथील हरिभाऊ गिते, साकूर येथील परंपरागत विरोधक बाळासाहेब कोंडाजी खेमनर व बुवाजी खेमनर यांचीही नावे चर्चेत आहेत. तसेच विद्यमान आमदार अमोल खताळ पा.व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांचे निकटवर्तीय रऊफ शेख यांच्याही नावाची चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे.

जातीय समीकरणे जुळवण्याचा विचार झाला तर या गटात जि.प.साठी मराठा विरुद्ध मराठा किंवा धनगर विरुद्ध धनगर अशीच लढत होण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी रऊफ शेख हे सध्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य असुन आमदार अमोल खताळ व विखे पा.यांचे निकटवर्तीय व अत्यंत विश्वासु तसेच अभ्यासु कार्यकर्ते म्हणुन त्यांची ओळख आहे. मागील काही वर्षांमध्ये महायुतीचे गटातील कोलमडलेले संघटन उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे रऊफ शेख यांना उमेदवारी देऊन जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाला एक वेगळा संदेश विखे पा.हे देऊ शकतात असाही काहींचा अंदाज आहे. तसेच रऊफ शेख यांचे सर्व समाजाशी सलोख्याचे सबंध असुन यामुळे त्यांनाही या स्पर्धेत उमेदवारी मिळाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही अशी परिस्थिती आहे. नव्या-जुन्यांचा मेळ घालत सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन महायुतीच्या उमेदवारासमोर असणार आहे.

पिंपळगाव देपा गणातुन काॅंग्रेसकडुन रणखांबचे सरपंच बाबाजी गुळवे, वरवंडीचे राजु वर्पे, डोळासणे येथील संदीप काकड, खांबे येथील माधव अण्णा दातीर, रवी जोशी, मांडवे येथील आदिक खेमनर यांची नावे चर्चेत आहेत तर महायुतीकडुन कर्जुले पठारचे किरण भागवत, रवींद्र भोर, पिंपळगाव देपा चे उपसरपंच रणजीत ढेरंगे, खांबेचे सरपंच रवींद्र दातीर, मांडवे येथील ॲड.अमित धुळगंड यांची नावे चर्चेत आहेत.

साकूर गणासाठी काॅंग्रेसकडुन आदिक खेमनर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. याबरोबरच शिंदोडी येथील लक्ष्मण कुदनर, जांबुत येथील सुभाष डोंगरे यांचेही नाव चर्चेत आहे. प्रा.रामदास धुळगंड यांची निवड कारखान्याचे संचालक पदी झाल्याने कारखाना निवडणुकीनंतर रुपेश धुळगंड यांचे नाव मागे पडले आहे.

महायुतीकडुन साकूर गणासाठी मांडवे येथील ॲड.अमित धुळगंड, खांबेचे सरपंच रवींद्र दातीर, बुवाजी खेमनर तसेच बाळु कोंडाजी खेमनर यांच्यासह रऊफ शेख यांचाही विचार होऊ शकतो.

या काही ठराविक नावांभोवतीच सध्यातरी लोकांमध्ये प्राथमिक अंदाज व तर्क लावुन चर्चा घडताना दिसत आहे. एकंदरीतच ही सर्व नावे जि.प.व पं.स.गणासाठी चर्चेत असली तरी महायुतीच्या उमेदवारी बाबत अंतिम निर्णय हा आमदार अमोल खताळ पा. व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व काॅंग्रेसकडुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेच घेणार असल्याने ऐनवेळी नवीन चेहराही समोर येऊ शकतो. तत्पुर्वी आरक्षण व गट व गण रचना बाबत अद्याप स्पष्टता नसल्याने हा फक्त एक अंदाजच आहे. हा अंदाज कितपत खरा ठरतोय हे लवकरच येणारा काळच ठरवेल.

Leave a Comment