राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार असून राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, या आघाडीला शरद पवार यांनी आपला पाठिंबा दिला नाही.
द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची घाई असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांनुसार, भाजपसोबतच्या या आघाडीला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मात्र, पवार हे भाजपसोबत जाण्यास उत्सुक नाहीत. भाजपसोबत आघाडी करून शरद पवार यांना राजकीय कारकिर्दीत उजव्या शक्तींसोबत जाण्याचा कलंक लावून घ्यायचा नाही, असे . ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे.
शरद पवार हे अजूनही जनभावना बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पवार यांच्या पाठिंब्यासाठी धडपड सुरू आहे.
दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांनी स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यास सांगितले आहे. अजित पवार यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असल्याचे म्हटले जात आहे.
