संगमनेरजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू, ८ जखमी

संगमनेर – शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. पहाटे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर खासगी बस आणि आंब्याचा ट्रकचा अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात ते आठ जण गंभीर जखमी आहे. अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतेय. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात कोल्हार-घोटी राज्यमार्गावर आज पहाटे खाजगी ट्रॅव्हल बस आणि आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. त्याशिवाय जखमींना रूग्णालयात उपचारासाठी त्यांनी दाखल केलेय. अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल बस आणि समोरून येणाऱ्या ट्रकची पहाटे जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.

चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज प्रथमदर्शी व्यक्तीने व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Comment