संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुकीसाठी संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या साकूर जिल्हा परिषद गट व गणात कोणामध्ये लढत होणार याची चर्चा झडू लागली आहे. गट व गणांची रचना पूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार होणार की पुन्हा नव्याने आरक्षण निघणार याची उत्सकुता इच्छुकांसह नेते, कार्यकर्ते यांना आहे. हा गट काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो पण विधानसभेच्या पराभवामुळे या गटातील समीकरणेही बदलतील का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणूकांना अवघे काही महिने बाकी असतानाच साकूर जिल्हा परिषद गटातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यातच काही संभाव्य उमेदवारांबाबत काही माध्यमे सोशलमिडियातून एक्झिट पोलमधून निवडणूकीचा अंदाज घेत आहेत. मात्र साकूर गटात निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. तसेच ज्या संभाव्य उमेदवारांचे नाव एक्झिट पोलमध्ये घेण्यात आले होते त्यांची अक्षरशः एकच धावपळ उडाल्याचे बघायला मिळाले.
दरम्यान काही एक्झिट पोलमध्ये साकूर येथील बालाजी उद्योग समुहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले यांच्या नावाचा उल्लेख होता. मात्र या एक्झिट पोल नंतर बाबासाहेब भोसले यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकत एक्झिट पोल साठी संभाव्य उमेदवार म्हणून मला मतदान करू नये अशी विनंती केली आहे.
नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलय, वाचा…..
मी श्री बाबासाहेब भोसले(बालाजी उद्योग समूह साकुर) साकुर जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते व तमाम मतदारांना सांगू इच्छितो की, थोड्याच कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुकांचा कल जाणून घेण्यासाठी अनेक पत्रकार बंधू संभाव्य उमेदवार म्हणून माझे नाव काही लिंक मध्ये आढळून आले आहे. हा एक्झिट पोल हा गटापुरताच मर्यादित असायला हवा परंतु तसे न होता ही लिंक महाराष्ट्रात इतरत्र कुठे फिरवली जाते म्हणून हा एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरताना दिसून येत आहे म्हणून माझी मतदार बंधूंना विनंती आहे की , एक्झिट पोल साठी संभाव्य उमेदवार म्हणून मला मतदान करू नये विनंती.
