संगमनेर(DSNews24/किरण पुरी) आषाढी एकादशी निमित्ताने राज्यभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध शाळेत पायी दिंडीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्याप्रबोधिनी प्रशालेत पांडुरंगाच्या दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई ची वेशभुषा केल्याने एकच लक्ष वेधून घेतले होते.
या दिंडीने परिसरात पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीचा रंग पसरवला. दिंडीला पांडुरंगाच्या आरतीने सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांवरून दिंडी काढत भक्तीमय गीतांचा गजर केला. त्यानंतर बसस्थानकावर ही दिंडी थांबली असता, विद्यार्थ्यांनी पांडुरंगाच्या गाण्यांवर मनमोहक नृत्य सादर केले.
तसेच पारंपरिक रिंगण करत फुगडी देखील खेळण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्वांना साबुदाणा खिचडीचा स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला. या दिंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना होण्यास मदत झाली, असे शाळेच्या मुख्याध्यापक सुभाष घुगरकर व प्राचार्या गुलशन जमादार यांनी सांगितले. हा उत्सव विद्याप्रबोधिनी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आणि पांडुरंगाच्या भक्तीने सर्वांचे मन व्यापून टाकले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर , सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, रजिस्ट्रार हेमचंद होळकर, ॲड. अशोकराव हजारे, निवृत्ती खेमनर, किसनराव खेमनर, दिनकरराव भगत, अण्णासाहेब कुदनर, नामदेव खेमनर, तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दिंडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
