मुंबई – मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ठाकरे बंधूचं नव्हे तर ठाकरे कुटुंबिय एकत्र पाहायला मिळाले.यामुळे ठाकरेंची चौथी पिढी एकत्र व्यासपीठावर दिसून आली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील मराठीच्या मुद्द्यावरून आयोजित विजय जल्लोष मेळाव्यासाठी एकत्र आले होते. यावेळी, शेजारीच उभ्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हाताला धरुन पुढे घेतले. त्यानंतर राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित यांना उभे करत आत्याबाईंची भूमिका बजावल्याले बघायला मिळाले.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच हा विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटो देखील काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.
