संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रातील भक्तगणांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पठार भागाचे आराध्यदैवत तसेच जागृत देवस्थान म्हणजे वीरभद्र बिरोबा होय. दरवर्षी श्रावण महिन्यात बिरोबा यात्रेचा उत्सव होत असतो. नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा भरत असते. या यात्रेसाठी परराज्यासह राज्यभरातून तसेच अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबईसह अशा विविध ठिकाणांहून लाखो भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यासाठी यात्रेची जय्यत तयारी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी २९ जुलै रोजी नागपंचमी व ९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनचा सण आहे. या दोन्ही दिवशी लाखो भाविक बिरोबारायाच्या दर्शनासाठी येणार आहे. त्यामुळे यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विरभद्र देवस्थानच्या वतीने सुसज्ज नियोजन करत यात्रेची जय्यत तयारी सुरू केली आहे. भाविकांना बिरोबारायाचे दर्शन होण्यासाठी सुसज्ज अशी दर्शनबारी तयार केली आहे.
विशेषतः नारळी पौर्णिमेच्या दिवशी भाविक गंगेचे पाणी कावडीने पायी आणत बिरोबारायाला गंगास्नान घालतात. तसेच यात्राकाळात वाण, ओव्यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील वाटप केले जात असून विशेषतः अनेक स्वयंसेवक व तरूणांचे सहकार्य होत असते. तसेच मंदिर परिसरात विविध प्रकारचे दुकाने थाटली जातात.
त्यामुळे यात्राकाळात साकूर परिसर भक्तीमय वातावरणात फुलून गेलेला दिसून येतो. त्यामुळे यात्रा कमिटीच्या वतीने नियोजनात कुठलीही कमतरता कमी पडू नये यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा काळात परिसरातील गावागावांत डफांचा आवाज, बिरोबाचे नावाने चांगभलं या जयघोषाने अवघ्या परिसरात भक्तीमय वातावरण तयार होते. तसेच यात्राकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घारगाव पोलिस वॉच ठेवून असणार आहे.
