संजय राऊत संगमनेरकरांना म्हणाले, बाळासाहेब थोरातांना विधानसभेत का पाडलं?

अहिल्यानगर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.14) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात हजेरी लावली. यावेळी संजय राऊत यांनी तुम्हाला बाळासाहेब थोरातांनी काय कमी केलं, त्यांना तुम्ही विधानसभेला का पाडलं, असा थेट सवाल संगमनेरकरांना केला.

तसेच संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला याचं शल्य केवळ मलाच नव्हे तर महाराष्ट्राला आहे असं देखील संजय राऊत म्हणाले. यावेळी बाळासाहेब थोरात हे सुद्धा मंचावर उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील डीग्रस या गावात बुवाजी महाराज देवस्थानच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला संजय राऊत यांनी हजेरी लावली.

संजय राऊत नेमकं काय काय म्हणाले?

मी गेली चार पाच वर्षे सातत्याने इथे येतो. मला जेव्हा निमंत्रणाचा फोन आला तेव्हा मी दिल्लीत राहुल गांधींसोबत पोलिसांच्या ताब्यात होतो. इथली माणसं गोड आहेत, आग्रह मोडता येत नाही. या देवस्थानावर माझी श्रद्धा बसली आहे. दर्शन घेताना पुणेकर बाबांचा आवाज आला पक्ष आणि चिन्ह परत मागा.

बाळासाहेब थोरातांनी शाळा दिली, पाणी दिलं, मात्र तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही. आम्हाला याची खंत आहे. खोटेपणाचा विजय का झाला? बाळासाहेब थोरात विधानसभेत गेले नाही याचे शल्य आजही आहे. आमच्या सरकारने जनतेसाठी काय करायचे बाकी होते?. कोरोना काळात ठाकरे सरकारने जनतेला वाचवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र आमचं सरकार गद्दारी करून पडण्यात आलं.

Leave a Comment