महाराष्ट्रातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदलींची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या आठवड्यात 7 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर आता पुन्हा 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाशिम, अकोला आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीपदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच इतर महत्त्वाच्या पदांवरही नियुक्त्या झाल्या आहेत.
नव्या नियुक्त्या आणि बदल्या –
नुकत्याच जारी झालेल्या आदेशानुसार, योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, वर्षा मीना यांना अकोलाच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
याशिवाय, भुवनेश्वरी एस. यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रघुनाथ गावडे यांना मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रकपदी नियुक्ती मिळाली आहे.
यापूर्वी, गेल्या आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती, तर संजय कोलते यांना मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच, तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्याने रिक्त झालेल्या असंघटित कामगार विकास आयुक्तपदी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती झाली होती.
