संगमनेर(DSNews24/किरण पुरी) ‘माझा मुलगा खासदार श्रीकांत हा डाॅक्टर आहे. पण मी नाही. परंतु मी वेगळा डाॅक्टर आहे. चांगले, चांगले आॅपरेशन करतो. संगमनेरकरांनी मोठं आॅपरेशन केलं आहे. 40 वर्षे सगळ त्यांचंच. साखर कारखाना, काॅलेज माझेच. साखर माझीच, दूधपण माझं. बिस्किटपण माझं. चहा माझाच. जनतेला काय? धतुरा! पण अमोल खताळ मेवावाला माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे. वेडे झालेत फार! 440 चा झटका दिलाय, त्यातून ते बाहेर येतच नाही’, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता लगावला.
शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आभार सभेत शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणता राजा मैदानावर जोरदार भाषण केले. यावेळी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान सभेपूर्वी शहरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. या स्वागताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावून गेले होते.
“अमोल जायंट किलर ठरला, त्याचे अभिनंदन. पण संगमनेरकरांनी 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, त्यासाठी त्यांचे खास अभिनंदन. विधानसभा निवडणुकीत अमोलला खबऱ्या, खेळणं, असे म्हटलं गेलं. पण अमोलनेच तुमच्या हातात खुळखुळा दिला आहे. आता बसा खुळखुळा खेळत. अमोल काम करेल. त्याची खबर तुम्ही घेत राहा.” या विजयामुळे अमोल हा दिल्लीत देखील माहित पडला आहे, याचा अभिमान आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
दरम्यान विशेष करून, गेल्या आठवड्यात संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळावर, एकनाथ शिंदे यांनी थेट इशाराच दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी स्टेजवर वारकरी कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला होता. याचा धागा पकडत एकनाथ शिंदे म्हणाले, “वारकऱ्यांचा मी मुद्दाम सन्मान केला. वारकरी, कीर्तनकार महाराष्ट्राची ताकद आहे. वाकऱ्यांनाच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठं फेडणार हे पापा. हिंदू धर्म, सनातनाचा अपमान सहन करणार नाही. भगवा शिवरायांचा आहे. स्वाभिमानाचा आहे, हे लक्षात ठेवा.” असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.
दरम्यान या सभेला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
