छत्रपती संभाजीनगर(DSNews24/किरण पुरी) राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक सोमवारी (दि २५ ऑगस्ट) विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. दरम्यान या बैठकीत निवडणूकांच्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने पाळले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळे या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होण्यासाठी आता विविध शेतकरी संघटनेच्या वतीने थेट २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय ठरला असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी DSNews24 शी बोलताना दिलीय.
या बैठकीत विजय जावंधिया, माजी मंत्री बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, बाळशीराम पायमोडे, किरण वाबळे, संतोष वाबळे, अन्सार पटेल, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव व इतर शेतकरी संघटना नेते तसेच राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन द्वारे बैठकीस उपस्थित होते.
संतोष वाडेकर पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन, शेतकरी कर्जमाफी आणि MSP च्या भावावर २०% हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास विलंब केला आहे. त्यामुळे याचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबावर परिणाम होत असल्याने शेतकरी देशोधडीला लागला असून, त्याला न्याय मिळून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली.
बैठकीत घेतले खालील निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार आहे. तसेच शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे. शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जमुक्ती,सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव, बोगस खते व बियाणे प्रश्न, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे, सर्व कृषीनिविष्ठा GST मुक्त करणे आणि गाव एकक धरून शेतकरी हिताची पीकविमायोजना व खते बियाणे तपासणीसाठी गावावर टेस्टिंग लॅब स्थापन करणे या प्रमुख मागण्यासह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय ठरला असून हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असल्याचे संतोष वाडेकर म्हणाले.
