संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक असून बाप्पाचं आगमन हा प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. बुधवारी ( दि. २७ ऑगस्ट) लाडक्या गणरायाची स्थापना होणार असून याची गणेशभक्तांना आतुरता लागली आहे. त्यासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील साकूर येथे एक दिवस अगोदरच गणपती बाप्पाच आगमन झालय.
अतिशय जल्लोषात वाजतगाजत श्री स्वामी गणेश मंडळाने गणपती बाप्पा च स्वागत केलय. साकूर चौफुलीवर सजवलेल्या रथात गणरायाला बसविण्यात आले होते. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत पा. खेमनर, युवा नेते अनमोल पा. खेमनर, मांडवे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन रूपेश धुळगंड, युवा नेते सुजित पा. खेमनर, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव खेमनर यांच्या हस्ते गणेशपूजन करत गणरायाची आरती करण्यात आली.
गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. साकूर चौफुली पासून ते बसस्थानकापर्यंत वाजतगाजत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. साकूरमध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळे देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. त्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे. तसेच लाडक्या बाप्पाची बुधवारी घरोघरी मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
