उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ.अमोल खताळांवर खुश, मंत्रिपदाच गिफ्ट मिळणार.. 

संगमनेर(DSNews24) अभुतपुर्व सभा , लक्षवेधी रोड शो, सर्वत्र भगवेमय वातावरण यामुळे गाजलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या दौऱ्यातून आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेबरोबरच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेही मन जिंकल्याने या दौऱ्यातून आमदार खताळ यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहे. या दौऱ्याचा थेट फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी होणार आहे. आमदार खताळ यांच्या अचूक नियोजनामुळे आमदार खताळ यांच्या रूपातून एकनाथ शिंदे यांना शिवसेनेसाठी अनमोल हिरा मिळाला याचा फायदा आमदार खताळ यांना मिळणार असून भविष्यात त्यांना मंत्रीपदाचे बक्षीसही मिळण्याची शक्यता आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांनी चाळीस वर्षांपासून संगमनेरचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला होता. यामुळे संगमनेरची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनलेली होती. निवडणुकीनंतर आमदार खताळ यांनी धडाकेबाज कामांना प्रारंभ केला.‌ सार्वजनिक कामांबरोबरच वैयक्तिक गाठीभेटीवरही त्यांनी भर दिल्याने त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यांच्याकडे विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी संगमनेर बस स्थानकाच्या मागे संपर्क कार्यालय सुरू केले.

या कार्यालयाचे उद्घाटन व मतदारांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली.‌ या दौऱ्याच्या तयारीसाठी कोणताही मोठा नेता मागे नसताना व मोठी आर्थिक शक्ती मागे नसतानाही अतिशय उत्तम नियोजन आमदार खताळ यांनी या दौऱ्याचे केले.‌‌. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने संगमनेर महाविद्यालयाजवळ आगमन झाले या ठिकाणापासून जाणता राजा मैदानापर्यंत सर्वत्र मोठमोठ्या कमानी भगवे झेंडे लावण्यात आले होते. यामुळे संगमनेर येथील वातावरण भगवेमय झाले होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरात रोड शो पार पडला. या मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. या पेक्षाही अधिक गर्दी जाणता राजा मैदानावर पार पडलेल्या सभेत होती. आमदार अमोल खताळ यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. तब्बल तासभर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आमदार खताळ यांचे कौतुक केले.‌ महायुती सरकार आमदार खताळ यांच्या मागे खंभीरपणे उभे असून संगमनेर येथील विविध विकास कामे मार्गी लागले जातील असे त्यांनी सांगितले.

या सभेत बोलताना आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लक्ष वेधले. आमदार खताळ यांनी आपल्या भाषणातून आत्मविश्वासाने केलेल्या सर्व मागण्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्य केल्या. संगमनेरात एमआयडीसी सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या संबंधित मंत्रालयाला सूचना करतो असे त्यांनी सांगितल्याने उपस्थित तरुणांनी जल्लोष करत या घोषणेचे स्वागत केले. या दौऱ्यातून आमदार खताळ यांनी यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर थेट टीका करताना आमच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे असून गाठ माझ्याशी आहे असे त्यांनी सांगितले.

आमदार खताळ यांच्या रूपाने संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे असाच महायुतीचा भगवा आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतवर फडकवायचा असा निश्चय यावेळी करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला रोड शो, जाहीर सभा याचे उत्तम नियोजन झाल्याने हा दौरा यशस्वी झाला. आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील मतदारांबरोबरच शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मन जिंकले. याचा फायदा भविष्यकाळात आमदार खताळ यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार खताळ यांच्या बद्दल एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ते लवकरच आमदार खताळ यांना मोठी संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment