संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) विद्या प्रबोधिनी प्रशाला, साकुर येथे गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडली. साकुर चौफुली येथून अनमोल पाटील खेमनर यांच्या शुभहस्ते गणरायाची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
या मिरवणुकीत ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचा रोड शो साकुर बस स्थानक येथे आयोजित करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांचे मन जिंकले गेले.या रंगारंग रोड शोमध्ये गणपती गाणे, वासुदेव, पोतराज, गवळण, माऊली, कोळी गीत, लावणी, भोंडला गीत, आदिवासी गीत, खंडोबा नृत्य, शेतकरी नृत्य, गोंधळ जोगवा, पुन्हा लावणी आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश होता. प्रत्येक सादरीकरणाने महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पाटील खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पाटील खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. तसेच, पालकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनाचे मनापासून कौतुक केले.
या मिरवणुकीने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साकुर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र याचे कौतुक होत आहे. गणरायाला निरोप देताना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्या प्रबोधिनी प्रशालेने या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक जागरूकता आणि सामूहिक एकतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
