साकूर परिसरातील गणेश मंडळांना जयश्री थोरातांची भेट ठरली आकर्षण, “या” ठिकाणी अनोखं स्वागत 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात गणेशोत्सवामुळे अतिशय मंगलमय वातावरण बनले आहे. याच मंगलमय वातावरणात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी साकूर पठारभागात दौरा करत सार्वजनिक गणेश मंडळांना बुधवारी (दि.३ सप्टेंबर) आवर्जून भेटी दिल्या. जयश्री थोरात यांनी गेल्या वर्षी देखील याच सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या. यंदाच्या वर्षी देखील न चुकता त्यांनी गणेश मंडळांना भेटी देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.

दरम्यान या भेटीदरम्यान जयश्री थोरात यांचे ठिकठिकाणच्या गणेश मंडळांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. तसेच साकूर येथील श्री संत गोरोबा गणेश मंडळाने टाळ मृदंगांसह ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषासह हरिनामाच्या गजरात अनोखं स्वागत केल्याने जयश्री थोरात अक्षरशः भारावून गेल्याच बघायला मिळाले. यावेळी जयश्री थोरात यांनीही स्वतः गळ्यात टाळ घेत वारकरी बनल्याने उपस्थितीतांनी आश्चर्य व्यक्त केले.

तसेच मांडवे बुद्रुक येथील पाटीलवाडीवर गणेश मंडळाने देखील ढोल वाजवून लेझीम नृत्य सादर करत जयश्री थोरात यांचे खास स्वागत केले. यावेळी तर जयश्री थोरात यांनी देखील लेझीम खेळली. जयश्री थोरात यांच्या या कृतीने व साधेपणाने सर्वांची मने जिंकली.

पठार भागातील जवळपास ४० ते ५० गणेश मंडळांना जयश्री थोरातांनी भेटी दिल्याने मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकर्ते व तरुणांमध्ये उत्साह वाढल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी अबाल वृद्धांची मोठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी त्यांनी आपुलकीने सर्वांशी संवाद साधला. तसेच सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच कौतुक देखील केले. मात्र या दौऱ्यात साकूर येथील स्वामी समर्थ मंडळ ठिकाणी त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी सर्वांचे आरोग्य उत्तम राहो अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे जयश्री थोरातांनी केली.

या दौऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, सचिन खेमनर, युवा नेते अनमोल खेमनर, सुजित खेमनर, बाळासाहेब सागर आदि उपस्थित होते.

Leave a Comment