पावसाचा महिनाभर राहणार मुक्काम, राज्यात 18 तारखेपर्यंत जोरदार पाऊस

अहिल्यानगर – यंदा देशात 24 मे रोजी मान्सून केरळ व कर्नाटकात या ठिकाणी एकाच वेळी दाखल झाला. त्यानंतर त्याने देशभर 113 दिवस हजेरी लावून रविवारपासून (दि.14) राजस्थानच्या वाळवंटी, मारवाड भागातील श्रीगंगानगर, बिकानेर, नागौर, फालुदी, जैसलमेर, जोधपूर, बारमेर जिल्ह्यांच्या भागातून माघारीचा प्रवास सुरू केला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असला अजून महिनाभर महिनाभर देशात मान्सूनच्या पावसाचा मुक्काम राहणार आहे.

याबाबत पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, यंदा तीन दिवस आधीच देश पातळीवरून परतीच्या पावसाला सुरूवात झाली असली तरी अजून पुढील महिनाभर देशात परतीचा प्रवास सुरू राहणार आहे. साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सरासरी तारखेदरम्यान देशातून निघून जाईल आणि दक्षिणेकडील चार राज्यात तो ईशान्य मान्सून म्हणून तो स्थिरावेल. दरम्यान, रविवारपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 18) पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यातही आज सोमवार (दि.15) राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवमान विभागाच्यावतीने आज जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अर्लट जाहीर केला आहे.

Leave a Comment