नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी आज दिल्लीत वकील राकेश किशोर यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांच्या कृतीमुळे देशभरात खळबळ उडाली होती.
या घटनेचा निषेध करण्यासाठी लंके यांनी किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट देण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी (६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांच्याविरुद्ध बंगळुरूमधील विधान सौधा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (SCBA) त्यांचे तात्पुरते सदस्यत्व रद्द केले असून, सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यावर बंदी घातली आहे.
खासदार निलेश लंके यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. राकेश किशोर यांनी केलेली कृती केवळ सरन्यायाधीशांचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान आहे. ही कृती संकुचित आणि मनुवादी विचारसरणीतून प्रेरित आहे. संविधानाची जाणीव करून देण्यासाठी मी त्यांना आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन भेटलो.”
राकेश किशोर यांच्याविरुद्ध ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वत: राकेश किशोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर देशभरातून राकेश किशोर यांच्या कृतीवर टीका होत आहे. खासदार निलेश लंके यांनी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
