तुमच असण आमच्यासाठी सर्वकाही होते,
ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होत….
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसण ही मोठी उणीव आहे..
गेलात सोडूनी आम्हांस, आठवण येते क्षणाक्षणाला….!
हरिश्चंद्रगडावरून उगम पावणाऱ्या मुळामाईंच्या किनारी वसलेल्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पावनभूमीत समाजभान असलेले आणि लोकनेतृत्वाचे बीज बाळगणारे माजी उपसरपंच स्व. दादा अब्दुल पटेल यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. साकूरसारख्या भूमीतील दादा पटेल कायमच गोरगरीब जनतेसाठी धावून गेले. कायमच त्यांचा चेहरा फुललेला असायचा. दादा यांनी त्यांच्या काळात पिठगिरणी चालवली. परंतु पिठगिरणी चालवताना त्यांनी एखाद्या ग्राहकाकडे पैसे देयला नसले तरी त्यांना समजावून घेत होते.
तसेच एखाद्याला आर्थिक अडचण आली तर त्यांनी निःसंकोचपणे खिशात हात घालून प्रामाणिकपणे मदत करण्याच काम केले. त्यामुळे जनसामान्यांच्या मनात आणि हृदयात आपुलकी निर्माण केली होती. तसेच ते मुस्लिम समाजाचे नेतृत्व असताना देखील त्यांनी इतर समाजाला सोबत घेऊनच अहोरात्र कार्य केले. कुटुंबनियोजना सोबत त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने शेती फुलवली. तसेच इतर व्यवसायात देखील त्यांनी उंच शिखर गाठले.
परंतु दादा पटेल यांना त्यांच्या तेजस्वी बुद्धीने त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यात ओढलं. त्यांनी कधीच पदासाठी धाव घेतली नाही, मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ३० वर्षं राजकारणात महत्वाची भूमिका बजावली. कॉंग्रेस पक्षाचे त्यांनी एकनिष्ठ काम केले. त्यांना एक अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. दादा पटेल यांनी तीन वेळा साकूर ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषविले. त्यांनी त्यांच्या वार्डात अनेक विकासकामे केली. त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास संपादन केला होता. त्याचबरोबर कुणीही भेटले तर दादा पटेल प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत असत.
दादा पटेल यांचं जीवन खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी ठरले. कारण अत्यंत स्वज्वळ, आपुलकीने विचारपूस करणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे दादांनी उच्च पदावर काम करून एक ठसा उमटवला. विशेषतः त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाला उच्चशिक्षित केलं. समाज, कुटुंब आणि गाव या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी जबाबदारीने काम केलं. तसेच दादांनी अविरतपणे न चुकता सर्वांच्या सुख दुःखात सहभाग नोंदविला.
गेली ३० वर्ष कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ काम करणाऱ्या दादांनी शेवटी कॉंग्रेस पक्षाची फारकत घेतली. त्यानंतर साकूर ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु दादांनी जे त्यांच्या कार्यकाळात करून ठेवलं होतं त्यामुळे दादांवर मतदारांचा विश्वास होता. आणि तरीदेखील दादांनी निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. दादांचा हा विजय अनपेक्षित होता. कारण दादांचा पराजय करण्यासाठी कॉंग्रेसने मोठी ताकद लावली होती. म्हणजेच दादांनी जेवढ्या निवडणूक लढविल्या त्यात एकही पराभव न होता दादा अपराजित राहिले.
दादांच्या रुबाबात कधीच फरक पडला नाही, पांढरा पायजमा, तीन बटणाचा शर्ट आणि जनसामान्यांमधील आत्मविश्वास! त्यांच्या डोळ्यासमोर कुटुंबाची घडी बसवली गेली. कुटुंब सक्षम झालं, सर्व सदस्य कर्तबगार झाल्याच त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर बघितली आणि १० ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी शांततेने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने साकूर गावाची एक समृद्ध सामाजिक आणि राजकीय परंपरा जणू थांबली आहे. एक समाजपुरुष आणि खरं तर एक चालतं बोलतं युग हरपलं आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
स्व. दादा अब्दुल पटेल यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण जनतेतून भावपूर्ण श्रद्धांजली
