संगमनेर(DSNews24 ) तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील सोपान पांडुरंग कडनर (वय ४०) या भूमिहीन मजुराचा मृतदेह नांदुर शिंगोटे–कोल्हार हायवेवरील माऊली लॉन्स जवळ रस्त्याच्या कडेला आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोपान कडनर हे मिळेल ते छोटे-मोठे मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
संगमनेर ग्रामीण पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बीट हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे, पंच म्हणून प्रेम गायकवाड, सरपंच भाऊसाहेब कडनर पोलीस पाटील मिनाक्षी गायकवाड हे उपस्थित होते.
कडनर यांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू अपघाती नसून घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
या घटनेने नान्नज दुमाला परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, घटनेमागील कारणांबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
