साकूर गट विखे – थोरातांसाठी प्रतिष्ठेचा बनला, ऐनवेळी घडू शकते “ही” गोष्ट, उमेदवार कोण?

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर ज्या त्या प्रभाग, गट व गणात इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात निवडणूका होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मतदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा तसेच सर्वांचेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागले आहे. कारण या गटावर या आधी कॉंग्रेसचा दबदबा होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे साकूर जिल्हा परिषद गट हा आज प्रतिष्ठेचा बनला असून या गटातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी निघालेल्या आरक्षण सोडतीत साकूर जिल्हा परिषद गटासाठी “सर्वसाधारण” आरक्षण निघाल्याने काँग्रेस व भाजपसह विविध पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. तसेच साकूर गणाकरिता “ओबीसी महिला” व पिंपळगाव देपा गणासाठी “सर्वसाधारण” आरक्षण निघाले आहे. त्यामुळे गट व गणासाठी महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण कोण उमेदवार असणार तसेच वरीष्ठ कोणाला संधी देणार याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने साकूर जिल्हा परिषद गट हा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे.

त्यामुळे विखे आणि थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हींकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागणार आहे. मात्र जिल्हा परिषद गटासाठी कॉंग्रेसकडून बाळासाहेब भाऊसाहेब सागर व भाजपकडून गुलाब पांडुरंग भोसले यांच्यात थेट सामना होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. जवळपास ही नावे निश्चित मानले जात असून या नावांची फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

तसेच ऐनवेळी साकूर जिल्हा परिषद गटात तीरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. कारण काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा असून ऐनवेळी ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे ते अपक्ष कोण असणार लवकरच स्पष्ट होणार आहे.

मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची आचारसंहिता नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना लागू शकते. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवविण्यात आला आहे. तसेच नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. १० नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग प्राप्त झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात. दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची शक्यता आहे. यानंतर महापालिका निवडणुका होणार असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरअखेर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे स्थानिक निवडणुकांचा बार लवकरच उडणार असून, सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागलेले आहे.

Leave a Comment