ब्रेकिंग! साकूर गट, पंचायत समितीसाठी धक्कादायक उमेदवारांची नावे समोर, वाचा किरण पुरी यांचा स्पेशल रिपोर्ट 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर ज्या त्या प्रभाग, गट व गणात इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात निवडणूका होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मतदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा तसेच सर्वांचेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागले आहे. कारण या गटावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचाच दबदबा आहे. सन २०१७ साली या गटात जिल्हा परिषद सदस्य कॉंग्रेस पक्षाचा निवडून आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती काहिशी बदलली आहे. त्यामुळे साकूर जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला असून या गटातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

साकूर गटासाठी सर्वसाधारण, पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण व साकूर गणासाठी ओबीसी महिला आरक्षण 

दरम्यान काही दिवसांपूर्वी निघालेल्या आरक्षण सोडतीत साकूर जिल्हा परिषद गटासाठी “सर्वसाधारण” आरक्षण निघाल्याने काँग्रेस व भाजपसह विविध पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. तसेच साकूर गणाकरिता “ओबीसी महिला” व पिंपळगाव देपा गणासाठी “सर्वसाधारण” आरक्षण निघाले आहे. त्यामुळे गट व गणासाठी महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण कोण उमेदवार असणार तसेच वरीष्ठ कोणाला संधी देणार याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने साकूर जिल्हा परिषद गट हा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे विखे आणि थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हींकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

साकूर जिल्हा परिषद गटासाठी कोण उमेदवार 

कॉंग्रेसकडून बाळासाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित 

साकूर जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीकडून साकूर पठार भागातील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब बापू सागर यांचे चिरंजीव बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कारण संपूर्ण जिल्हा परिषद गटात त्यांचा मोठा परिवार आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो.

महायुतीकडून उमेदवारीसाठी दोन नावे चर्चेत 

त्याचबरोबर महायुतीकडून एक वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गुलाब पांडुरंग भोसले हे देखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. परंतु पठार भागात भाजपाचे एकनिष्ठ पणाने कार्य केलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर हे देखील पुन्हा जिल्हा परिषद निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. कारण बाळासाहेब खेमनर यांनी या गटात २०१२ साली राष्ट्रवादीकडुन उमेदवारी करत काॅंग्रेसच्या सत्यजीत तांबेंना जोरदार टक्कर दिली होती. यामध्ये समोर विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे हे बलाढ्य उमेदवार असतानाही सर्वसामान्य उमेदवार असणारे बाळासाहेब खेमनर यांनी चांगली मते मिळवली होती. मात्र या निवडणुकीत फार कमी मतांच्या फरकाने बाळासाहेब खेमनर यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचा राजकीय दृष्ट्या मोठा अनुभव आहे. त्यामुळे ऐनवेळी बाळासाहेब खेमनर यांच्या नावाचा पुन्हा विचार होऊ शकतो का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

साकूर गणासाठी कोण उमेदवार? 

तसेच साकूर गणासाठी ओबीसी महिला आरक्षण लागल्याने या गणातून निवडणूक येणारी पंचायत समिती सदस्य ही महिला असणार आहे. त्यामुळे ही संधी साधण्यासाठी साकूर गणासाठी महाविकास आघाडीकडून मिनाक्षी आदिकराव खेमनर, संध्या भागवत शेंडगे यांचं नाव चर्चेत आहे. तसेच महायुतीकडुन ज्योती बंडू खेमनर, सुनिता बुवाजी खेमनर यांची नावं चर्चेत आहे. मात्र ऐनवेळी कोण उमेदवार असणार हे वेळेलाच स्पष्ट होणार आहे.

पिंपळगाव देपा गणासाठी कोण उमेदवार? 

त्याचबरोबर पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाले आहे. त्यामुळे या गणातून काॅंग्रेसकडुन रणखांबचे सरपंच बाबाजी गुळवे, राजु वर्पे, संदीप काकड, माधव अण्णा दातीर, रवी जोशी, किरण मिंडे यांची नावे चर्चेत आहेत तर महायुतीकडुन किरण भागवत, रवींद्र भोर, पिंपळगाव देपा चे उपसरपंच रणजीत ढेरंगे, ॲड. अमित धुळगंड, कांतीलाल गिते, भागवत कुदनर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे सध्यातरी या नावांभोवती चर्चा सुरू आहे.

परिवर्तनाच्या लाटेत गटातून बाळासाहेब थोरातांना १३०० मतांचं लीड

दरम्यान संगमनेर विधानसभा निवडणुकीत जायंट किलर आमदार अमोल खताळ यांनी काॅंग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव केल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. मात्र संपूर्ण तालुक्यात विरोधी परिवर्तनाची लाट असतानाही साकूर गटाने माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना 1300 मतांची आघाडी दिल्याने साकूर गट हा काॅंग्रेस कार्यकर्त्यांसाठी आजही अनुकुल असल्याचे काॅंग्रेसच्या नेत्यांचे ठाम मत आहे. त्यातच कॉंग्रेस नेत्यांनी आता अचूक पाऊल टाकत रणनिती आखायला सुरुवात केली आहे. सध्या पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असून आगामी काळात काय घडामोडी घडणार हे हळूहळू समोर येणार आहे.

साकूर गटाचा काय इतिहास

साकूर गट हा सन २०१२ साली सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला होता. तसेच सन २०१७ साली महिला राखीव होता. या दोन्ही वेळी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. सन २०१२ साली या गटात राष्ट्रवादीकडुन बाळासाहेब कोंडाजी खेमनर विरुद्ध काॅंग्रेसचे सत्यजीत तांबे अशी जोरदार लढाई झाली होती. यामध्ये कॉंग्रेसचे सत्यजीत तांबे हे बलाढ्य उमेदवार असतानाही सर्वसामान्य उमेदवार असणारे बाळासाहेब खेमनर यांनी चांगली मते मिळवली होती व फार कमी मतांच्या फरकाने सत्यजीत तांबे विजयी झाले होते. यानंतर २०१७ साली झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसकडुन जांबुत बु येथील मिराताई पांडुरंग शेटे तर भाजपकडुन कौठे मलकापुर येथील हिराबाई हरिभाऊ गिते अशी लढत झाली होती. यामध्ये काॅंग्रेसकडुन मिराताई शेटे विजयी झाल्या होत्या. तसेच त्यानंतर त्यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदाचीही पहिल्याच टर्ममध्ये संधी मिळाली होती. त्यामुळे कॉंग्रेस पुन्हा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सज्ज झाली आहे.

थोरात समर्थक विरुद्ध विखे समर्थक अशी होणार लढाई

मात्र जिल्हा परिषद निवडणूकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार की घटक पक्ष स्वतंत्र लढणार याबाबतही अजुन स्पष्टता नसली तरी साकूर गटात मात्र ही लढाई थोरात समर्थक विरुद्ध विखे समर्थक अशीच असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होईल यात कोणतीही शंका नाही. तसेच कॉंग्रेस व भाजपमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य असल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसमोर नाराजी दूर करण्याच मोठे आवाहन असणार आहे.

संभाव्य उमेदवारांभोवतीच सध्यातरी चर्चा घडताना दिसत आहे. एकंदरीतच ही सर्व नावे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी चर्चेत असली तरी महायुतीच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ व काॅंग्रेसकडुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेच घेणार असल्याने ऐनवेळी नवीन चेहराही समोर येऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने हा फक्त एक अंदाजच आहे. मात्र हा अंदाज कितपत खरा ठरतोय हे येणारा काळच ठरवेल.

साकुर जिल्हा परिषद गट

पिंपळगाव देपा गणातील गावे 

वरवंडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे, शिंदोडी, कर्जुले पठार, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी,

साकूर गणातील गावे 

साकुर, जांभूळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबुत बुद्रुक, हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी

Leave a Comment