शिरूर(DSNews24) महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेबांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील काही दिवसांपूर्वी रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुःखद मृत्यू झाला होता त्या मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
बिबट्यांचा नागरी वस्तीमध्ये वाढलेला वावर आणि माणसांवरील वाढते हल्ले ही काळजीची बाब झाली असून शिरूर, खेड, अहिल्यानगर या भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू असले तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करून त्यांना अन्यत्र हलवण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. त्यासाठी वन विभागाने जागोजागी पिंजरे लावले असून बिबटे जेरबंद करून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी नक्की प्रयत्न केले जातील असे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.
या वेळी ना. शिंदे साहेबांनी त्या मयत मुलाच्या घरी भेट दिली असता घराची बिकट अवस्था पाहून मृत मुलाच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याचे आश्वासनही दिले
यावेळी शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना नेते रमेश येवले, सरपंच रविंद्र वळसे पाटील, माजी सरपंच नरेश ढोमे, पिंपरखेडचे उपसरपंच विकास वरे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे, किरण ढोबळे, श्रीकांत लोखंडे, तसेच वन विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि इतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
