पारनेर (DSNews24/किरण पुरी ) सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून गहू, कांदे, हरभरा, मका यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पण सध्या बिबट्यांचा अति प्रमाणात वावर होताना दिसत असल्याने रात्रीच्या वेळी नागरिक, शेतकऱ्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल बनले आहे. अशातच शेती पंपांना रात्री वीज मिळत असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे ही मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर असल्याने शेती सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी याची गांभीर्याने दखल घेत शेतीपंपांना दिवसा विज पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
भूमिपुत्रच्या इशाऱ्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत वारणवाडी सबस्टेशन अंतर्गत वीज वितरण होणाऱ्या मांडवे, देसवडे, जावळदरा, बोरमळई या भागात दिनांक १ डिसेंबरपासून सकाळी ६ ते दुपारी १२ व दुसऱ्या आठवड्यात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या पद्धतीने शेतकऱ्यांना वीज सुरू करण्यात आली आहे. दिवसा विज देण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
