अहमदनगर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज (दि.28) सात बाजार समित्यांसाठी मतदान होऊन उद्या (29) मतमोजणी होणार आहे.
आज मतदान होणार्यांमध्ये संगमनेर, राहुरी, नगर, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी आणि कर्जत या बाजार समित्यांचा समावेश आहे.
दरम्यान, राहुरी बाजार समितीची मतमोजणी मतदान झाल्यावर आजच लगेच सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे. अकोले, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव बाजार समितीची निवडणूक रविवारी 30 एप्रिल रोजी होत असून मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील 14 तालुका बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात सात ठिकाणी आज (शुक्रवारी) व उर्वरित सात ठिकाणी रविवारी मतदान होणार आहे.
मतदान झाल्यावर राहुरी वगळता दुसर्या दिवशी मतमोजणी होऊन चुरशीच्या लढतीत गुलाल कोणी घेतला, हे स्पष्ट होणार आहे.
