Ahmednagar – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेची बिले नवीन सरकार स्थापन झाल्यापासून थकीत आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र चालकांनी ही केंद्र चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे.
यासंदर्भात राज्य शासनाच्या पुरवठा मंत्रालयाने हे अनुदान त्वरित निर्गमित न केल्यास जिल्ह्यातील हजारो गोरगरीब उपाशी राहणार आहेत. त्यामुळे हे अनुदान तात्काळ द्यावे अन्यथा महाराष्ट्र दिनी महसूल मंत्र्यांची गाडी रोखण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक याना निवेदन देण्यात आले आहे.
ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या अथवा उपजीविकेचे साधन नसलेल्या गोरगरीब जनतेची भूक भागत होती महाआघाडीच्या माध्यमातून राज्य शासनाने गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये, यासाठी शिव भोजन केंद्रे सुरू केली होती प्रारंभी शहरात सात ते आठ केंद्र सुरू करण्यात आली होती. त्याची संख्या आता 17 झाली आहे, तसेच संपूर्ण जिल्ह्यात मिळून ही संख्या 34 आहे.
या केंद्रांना प्रत्येक थाळी मागे राज्य शासन नाममात्र अनुदान देत होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह पळविणारे आणि स्वतःला जनतेचे कैवारी म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अनुदान बंद करून टाकले. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हे अनुदान रखडल्याने आता ही शिवभोजन थाळी केंद्र चालविणार्या केंद्र चालकांनाही केंद्र चालविणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
