संगमनेर(DSNews24/किरण पुरी) साकूर – संगमनेर व साकूर – मांडवे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. मात्र या रस्त्यावर मांडवे बु येथील पुलाजवळील तालुका हद्दीपासुन ते साकूरफाटा पर्यंत अनेक ठिकाणी साईडपट्ट्या नसल्याने रस्त्यावरुन प्रवास करताना मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच दुचाकीस्वारांना कसरत करून वाहन चालवावे लागत होते. तसेच रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते. या रस्त्यावरुन प्रवास करणार्या नागरिकांची समस्या लक्षात घेऊन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे लेखी मागणी करत या विषयाकडे लक्ष वेधले होते.
या मागणीची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ सुचना केल्या होत्या. यावेळी दिवाळीनंतर सदर काम करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन कळवण्यात आले होते. त्यानंतर मागील दोन दिवसांपासुन शिंदोडी ते मांडवे, तसेच मांडवे बु च्या पुलापासुन ते पुणे-नाशिक महामार्गाला जोडणार्या साकूरफाटा पर्यंत रस्त्यांच्या साईडपट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
तसेच रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे बुजवणे तसेच साईडपट्टी दुरुस्तीच काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान या प्रश्नाकडे लक्ष वेधुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी रऊफ शेख यांच्याबरोबरच आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे.
