संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दारात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या तारखा अद्यापही जाहीर झाल्या नाहीत. मात्र कधीही निवडणूक आयोग निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषदेच्या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या गटात महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार म्हणून बाळासाहेब भाऊसाहेब सागर व महायुतीकडून संभाव्य उमेदवार गुलाबराजे पांडुरंग भोसले या नावांची चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सध्या स्थितीत बाळासाहेब सागर व गुलाबराजे भोसले पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत.
लग्न, साखरपुडा, अंत्यविधी, दशक्रिया… कुठलाही कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी दोन्ही संभाव्य उमेदवार उपस्थिती नोंदवत आहेत. या उपस्थितीचाच उपयोग करून ते स्वतःच्या पक्षाचे आणि गटाचे ब्रँडिंगदेखील करण्याचे काम कसोशीने करत आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची जोरदार चर्चा सध्या साकूर जिल्हा परिषद गटात होताना दिसत आहे. बऱ्याचदा हे दोन्ही संभाव्य उमेदवार एकाच कार्यक्रमात आल्याचं बघायला मिळतय. तसेच त्यांच्या पक्षाचे नेते देखील उपस्थित असतात. मग काय एकमेकांसमोर नेते मंडळी आल्यावर राजकीय विनोदी टोलेबाजी होताना बघायला मिळते. असच एक उदाहरण नांदूर येथील भागवत आणि मोरेवाडी येथील मोरे परिवाराचा शुभविवाह प्रसंगी बघायला मिळाले. घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात हा शुभविवाह वार – रविवार दि. १४ डिसेंबर रोजी पार पडला. या शुभविवाह प्रसंगी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेत्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी साकूर जिल्हा परिषद गटाचे मविआचे संभाव्य उमेदवार बाळासाहेब सागर व महायुतीचे संभाव्य उमेदवार गुलाबराजे भोसले हे देखील एकाच वेळी स्टेजवर उपस्थित झाले. यावेळी स्टेजवर बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ जयश्री थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, थोरात कारखान्याचे संचालक नवनाथ अरगडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष किशोर डोखे उपस्थित होते.
शुभविवाहाला काही वेळ बाकी होता. मात्र या दरम्यान स्टेजवर एकमेकांचे विरोधक असलेले राजकीय मंडळी एकत्र आल्यावर राजकीय चर्चा तर होणारच अन् झालही तसंच! यावेळी महायुतीचे संभाव्य उमेदवार गुलाबराजे भोसले तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर आणि कॉंग्रेसचे नेते शंकरराव खेमनर यांच्यात काही तरी विनोदी राजकीय टोलेबाजी झाल्याचं बघायला मिळाले. कारण यावेळी चर्चा सुरू असताना तिघेही व तसेच आजूबाजूला बसलेले राजकीय मंडळी खळखळून हसत असल्याचे DSNews24 च्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र एकमेकांना काय राजकीय टोलेबाजी केली याची माहिती समोर आली नाही. मात्र उपस्थितांमध्ये या दृश्याची चांगलीच चर्चा बघायला मिळाली.
उमेदवारांची होतेय मोठी ‘दमछाक’
सध्या लग्नसराई मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. थंडीचे दिवस असुनही या लग्न सोहळ्यांना पै-पाहुणे, मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे. त्यामुळे लग्न सराई जल्लोषमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरे होताना दिसत आहेत. लग्नाची शोभा वाढवण्यासाठी लग्न मालकांकडुन आग्रह करून नेतेमडंळीनां बोलवले जात आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेख्यातर नेते मंडळी ही वेळात वेळ काढून लग्न सोहळ्यास उपस्थिती दर्शवित आहेत. परंतु यात नेतेमडंळीची मात्र मोठी ‘दमछाक’ होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे पडघम ग्रामीण भागात वाजु लागले आहेत. त्याअंनुषगांने लग्न सोहळ्यास उपस्थित राहुन आपल्या कार्यकर्त्यांना खुष करण्याचे काम सर्वच नेते मंडळी करत आहेत. लग्नाला न जावे तर कार्यकर्ता नाराज होईल म्हणुन दिवसभरातीत सर्व वेळ नेतेमडंळी विवाह सोहळ्यासाठी खर्ची घालताना दिसत आहेत. परंतु लग्न सोहळ्याला एकाच दिवशी अनेक ठिकाणची निमंत्रण असल्याने उपस्थित दर्शविण्यासाठी नेतेमडंळीची पुरती ‘दमछाक’ होत आहे.
दिवसभरात असलेल्या दहा ते बारा लग्न सोहळ्यात आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या लग्नास भेट देण्यास नेतेमडंळीना आटापिटा करावा लागत आहे. तर दुसरीकडे लग्न मालक (नेत्यांचा कार्यकर्ता) नेतेमडंळी आल्याशिवाय लग्न लावत नसल्याने नियोजीत वेळेपेक्षा लग्न उशीरा लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे. दरम्यान नेतेमडंळीची उपस्थिती लग्न सोहळ्यांना लागत असल्याने ‘आपला नेता आपल्यासाठी किती करतो अशी भावना’ लग्न मालक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात येत आहे
