राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातही मोठी फूट पडली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात एक वेगळा गट तयार झाला आहे. तर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं निवडणूक आयोगाने बहाल केलं. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीदेखील सुरु आहे. ही सुनावणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याबाबत आगामी काळात सुनावणी होईल किंवा न होईल हा पुढचा विषय आहे, पण आता एक नवी घडामोड समोर येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राहणारे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात एकत्र येणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मग महाविकास आघाडीचं अस्तित्व काय राहील? असा प्रश्न उपस्थित होईल.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मग आगामी काळात दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात का? असा देखील प्रश्न आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही शिवसेना एकत्र येणं शक्यच नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महाविकास आघाडीत घटकपक्षांमधला अंतर्गत कलह समोर येऊ शकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मविआतल्या नेत्यांकडूनच टीका केली जाऊ शकते. तसेच या घटनेमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
निलेश लंके नेमकं काय म्हणाले आहेत?
“दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना समाधान वाटेल, तसेच आम्हालाही आनंद होईल”, असं स्पष्ट मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केलं.
“पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. अजित पवारांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ पक्ष नसून शरद पवारांचा परिवार आहे. राजकीय मतभेद असले तरी सुख-दुःखात दोन्ही गट एकत्र राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकत्र येणं सर्वसामान्य नागरिकांनाही स्वीकारार्ह ठरेल”, असं ते म्हणाले. “राजकारणात क्षणाक्षणाला बदल होत असतात, त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनी वाट पाहावी”, असंही लंके यांनी स्पष्ट केलं.
