पुणे – लग्न होऊन जेमतेम महिनाही उलटला नव्हता, हातावरची मेहंदीही अजून उतरली नव्हती, तोवरच सासरच्यांनी नवविवाहितेचं आयुष्य नरक बनवलं. पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुनेचा अमानुष छळ तर केलाच, पण पैसे आणले नाहीत म्हणून चक्क बेल्टने फोडून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पीडित महिलेचा विवाह २४ नोव्हेंबर २०२४ ला झाला होता. पण संसाराची स्वप्न रंगवण्याआधीच पैशांची मागणी सुरू झाली. सासरच्यांनी शेअर मार्केटच्या तोट्याचं कारण पुढे करत ५ लाख रुपयांची मागणी केली. वडिलांकडून ३ लाख रुपये आणूनही त्यांची हाव शमली नाही. उपासमार आणि शिवीगाळ नित्याचीच झाली होती. २१ डिसेंबर २०२५ रोजी जेव्हा पीडिता सासरी परतली, तेव्हा “पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको,” असं म्हणत तिला अडवण्यात आलं.
घरात प्रवेश नाकारल्यानंतर सासरा प्रदीप याने सुनेला बेल्टने अमानुष मारहाण केली. पती राजदीपने लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, तर सासू हेमलतानेही हात साफ करून घेतले. या मारहाणीत विवाहितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
