नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ 

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधीचा वेळेत उपचार न मिळाल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. शाहूताई कांबळे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका होत्या. त्यांना आज पहाटेच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीने रुग्णालयासाठी दाखल करण्यासाठी नेले. मात्र, पहाटेच्या सुमारास अनेक खासगी रुग्णालयात वेळेत डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत.

नगरसेविका कांबळे यांचे नातेवाईक तब्बल तासभर उपचारासाठी डॉक्टरांचा शोध घेत राहिले. शेवटी पर्याय नसल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. शाहूताई यांची उपचाराआधीच प्राणज्योत मावली. नगरसेविका शाहूताई कांबळे यांना रुग्णालयात १५-२० मिनिटे उपचार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी हळहळ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शाहूताई कांबळे कोण होत्या?

शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने त्यांना उमेदवारी मिळाली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहूताई कांबळे यांनी जिद्दीने निवडणुकीत बाजी मारली होती. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत त्या १२ मतांनी पराभूत झाल्या होत्या. मात्र, यंदा झालेल्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

Leave a Comment