मुंबई (DSNews24 /किरण पुरी) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सुप्रीम कोर्टाने १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असेल.
मात्र राज्यातील अहिल्यानगर सह २० जिल्हा परिषदा आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसर्या टप्प्यात पार पडणार आहेत. पण दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका कधी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ५० टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे. त्यात निवडणूक होणार आहे. एकूण १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर या १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
या कारणामुळे लांबल्या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे अहिल्यानगरसह राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे प्रकरण कोर्टात गेले होते. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळेच २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या आहेत.
जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार?
२० जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. त्यातच १० आणि १२वीच्या परिक्षा होणार आहेत. त्याशिवाय शाळेमधील वार्षिक परीक्षाही होणार आहेत. त्यामुळे २० जिल्हा परिषदेच्या या निवडणुका मे अथवा जूनपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्हापरिषदांच्या निवडणुका? आरक्षण मर्यादा टक्केवारीमध्ये
जळगाव – ५४ टक्के
नंदुरबार – १०० टक्के
पालघर – ९३ टक्के
गडचिरोली- ७८ टक्के
नाशिक- ७१ टक्के
धुळे – ७३ टक्के
अमरावती – ६६ टक्के
चंद्रपूर – ६३ टक्के
यवतमाळ – ५९ टक्के
अकोला – ५८ टक्के
नागपूर – ५७ टक्के
ठाणे – ५७ टक्के
गोंदिया – ५७ टक्के
वाशिम – ५६ टक्के
नांदेड – ५६ टक्के
हिंगोली – ५४ टक्के
वर्धा – ५४ टक्के
भंडारा – ५२ टक्के
लातूर – ५२ टक्के
बुलढाणा – ५२ टक्के
