शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आला होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदूरबारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
माजी आमदार चौधरी यांना अटक केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात माजी आमदार चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे नंदूरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर शहरात विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत वाद झाला होता. रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती.या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान विजय मिरवणुकीत झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नंदुरबारमध्ये गुंडशाही सुरू आहे,ती सहन केली जाणार नाही,अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
शिरीष चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या नावाखाली दहशत निर्माण केली. मिरवणुकीत अंगप्रदर्शन करणे, चिथावणीखोर हावभाव करणे आणि भरवस्तीत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तसेच महिलांना जातिवाचक शिवीगाळ करणे, हा प्रकार केल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला होता. माजी आमदार शिरीष चौधरी यांचे कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सत्तेचा माज करत सर्वसामान्यांना धमकवत आहेत. इतकेच नाही तर गुजरातमध्ये बनावट दारू विक्री आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांत हे कुटुंब गुंतलेले असल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केलाय.
