धक्कादायक! राजीनाम्यासाठी सरपंच महिलेच्या पतीवर हल्ला

पुणे – महिलेने सरपंच पदाचा राजीनामा द्यावा यासाठी तिच्या पतीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून जखमी करण्यात आले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. इतकेच नव्हे तर यासोबतच महागड्या गाडीचे नुकसानही करण्यात आले.

प्राणघातक हल्ल्याची ही घटना मुळशी तालुक्यातील माणगाव येथे रविवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सचिन मच्छिंद्र आढाव (वय 39, रा. गणेशनगर, डांगे चौक) यांनी रविवारी (दि. ३०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आढाव यांची पत्नी अर्चना आढाव या माणगावच्या सरपंच आहेत. अर्चना आढाव यांनी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आरोपींनी हातात सिमेंटचा ब्लॉक घेऊन फिर्यादीच्या महागड्या गाडीचे दगडाने नुकसान केले.

तसेच आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्यांना जखमी केले. इतकेच नव्हे तर तुला जिवे ठार मारतो, अशी धमकीही दिली. दरम्यान, रवी बोडके, राज बहिरट, प्रदीप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके (रा. माण, ता. मुळशी) आणि इतर 10 ते 12 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Leave a Comment