संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या ५५ वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथे हनुमंत रायाच्या पदस्पर्शाने व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त अविरत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचे यंदाचे ५६ वे वर्ष असून या सप्ताहाचा शुभारंभ एकादशीच्या दिवशी म्हणजेच दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी झाला आहे. तसेच ६ मार्च २०२६ रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बिरेवाडी ग्रामस्थ व सप्ताह कमिटीच्या वतीने सप्ताहाची जय्यत तयारी केली आहे. ब्रम्हलिन प.पु. माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व मठाधिपती ह.भ.प.दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. दरवर्षी सप्ताह काळात हजारो भाविक उपस्थित राहून हरिकिर्तन व प्रसादाचा लाभ घेत असतात.
सप्ताहकाळात काकडा भजन, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर, तुकाराम गाथा पारायणासह विविध दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तसेच मठाधिपती ह.भ.प दत्तगिरी महाराज, संत घुले बाबा, दत्तानंदजी महाराज, सुधाकर महाराज मुळे शास्त्री, सखाराम महाराज गिरी, प्रकाश महाराज आव्हाड, गणेश महाराज घोडेकर तसेच नवनाथ महाराज म्हस्के यांचे ५ मार्च रोजी तुकाराम बिजेनिमीत्त व श्रावण महाराज अहिरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
दरवर्षी बिरेवाडी येथील सप्ताह ऐतिहासिक स्वरूपात संपन्न होत असतो. यंदाच्या वर्षी देखील ग्रामस्थांनी तशी तयारी केली आहे. भव्य मुख्य मंडप, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सप्ताह कमिटीने केली आहे. तसेच सप्ताहकाळात दैनंदिन पहारेकरी महाप्रसाद देणार आहे. तसेच सप्ताह आकर्षित होण्यासाठी रस्त्याच्या कडेला व हनुमंत रायाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे.
दरम्यान, ५ मार्च रोजी संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त खास सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी सकाळी ह.भ.प नवनाथ महाराज म्हस्के यांचे सकाळी १० ते १२ फुलांचे किर्तन होणार आहे. यावेळी संत तुकाराम महाराज बीज मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
या सप्ताहात तन – मन – धनाने पठारभागातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
