अहिल्यानगर – पत्नी गेल्या वर्षभरापासून नांदत नसल्याने आणि सासरे वारंवार वाद घालून सव्वा वर्षाच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी देत असल्याच्या रागातून जावयाने सासर्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात घडलेल्या या खून प्रकरणाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून जावयास त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली आहे.
22 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मयताचे भाऊ तुळशीराम निवृत्ती सोनवणे (रा. सुलतानपूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, आकाश काळे, विशाल तनपुरे आदींचे विशेष पथक स्थापन करण्यात आले.
पथकाने घटनास्थळी पाहणी करून गोपनीय माहिती संकलित केली. तपासादरम्यान हा खून मयताचा जावई अमित नारायण डुकरे (वय 34, रा. पारगाव तर्फे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय 31, रा. औरंगपूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी मिळून केल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही संशयितांना 25 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या पत्नीने सुमारे वर्षभरापासून नांदणे सोडले होते. त्यांना दीड वर्षांची मुलगी असून मयत सासरे वारंवार वाद घालत तसेच मुलीला ठार मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप त्याने केला. या रागातून अमित डुकरे याने मित्र अमोल डुकरे याच्या मदतीने सासर्याला कारमध्ये बसवून ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात नेले. तेथे वाहनातच त्यांचा गळा आवळून खून करून मृतदेह फेकून दिल्याची कबुली त्याने दिली आहे.
दरम्यान, मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही किंवा अन्य पुरावा उपलब्ध नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेसमोर होते. मात्र तपासादरम्यान एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद वाहन दिसून आले. वाहन क्रमांकाच्या आधारे त्या वाहनाचा शोध घेतला असता पोलीस अमित डुकरेपर्यंत पोहोचले. पुढील चौकशीत त्याने व त्याचा मित्र अमोल डुकरे यांनी मिळून सासर्याला वाहनात बसवून नेल्याची व गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
