जालन्यात चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर जिल्ह्यातील नजिक पांगरी येथे घडली होती. पीडितेच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणातील आरोपी हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे चुलत सासरे हे पीडितेच्या मागे गेले. ती शेतात गेली असता, सावध होऊन तिच्या मागून आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर ‘तु मला आवडतेस’, असे म्हणत तिला खाली पाडले आणि तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेनं सांगितले.
दरम्यान, पीडितेनं प्रतिकार केला असता, तिने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पडलेला लाकडी दांडा तिच्यावर फेकून मारला होता. या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाली होती. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. भयभीत झालेल्या पीडितेनं पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली होती. तिच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत सासऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
