जुन्नर हादरले! लग्नाला नकार दिल्याने तरूणीवर कोयत्याने हल्ला, आरोपी पसार

पुणे : पुण्याच्या जुन्नरमध्ये असणाऱ्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावच्या युवकाने लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जुन्नर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणारा आरोपी पसार झाला असून जुन्नर पोलीस आरोपीचा तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी वसतिगृहातून बाहेर पडली असता तिच्या मूळ गावचा असणारा युवक महेश मुरलीधर डामसे या युवकाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला

आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार केल्याची माहिती समोर येत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलंय.

जखमी विद्यार्थी आणि आरोपी दोघेही एकाच गावातील रहिवाशी असून लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने सदर हल्ला केल्याचा जबाब जखमी विद्यार्थिनीने पोलिसांना दिला. आहे. जुन्नर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत

Leave a Comment