गारपीटीचे भयंकर संकट….अहिल्यानगरसह “या” जिल्ह्यात आज मोठा इशारा

अहिल्यानगर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसून येत आहेत. कुठे उष्णतेची लाट येत आहे तर कुठे अवकाळी पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने 20 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज यापूर्वी वर्तवला होता. आता आज (गुरूवार) अहिल्यानगरसह जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून 21 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र असेल. पहाटेच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता आहे

Leave a Comment