नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याचदरम्यान, रुपाली चाकणकरांच्याच पक्षातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार…बजाव ताली…अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे. रुपाली पाटलांच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणी काल रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. नाशिकमधील विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही हा महिलांचा आहे. खरंच ट्रस्टवर राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई करत नव्हते का? 58 व्हिडीओ आहेत म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? रुपाली चाकणकर राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्या पाहिजे. त्याशिवाय तपास पूर्ण होणार नाही. चाकणकर त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार, असं रुपाली पाटील म्हणाल्या. मी सुनेत्रा पवारांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. चाकणकरांनी राजीनामा नाही दिला तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार, असा इशाराही रुपाली पाटील यांनी दिला आहे.
