अहिल्यानगरसह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा

अहिल्यानगर – राज्यातील अनेक जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) सायंकाळी ते रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकर्‍यांची दाणादाण उडवली. यात नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश असून या ठिकाणच्या 41 गावांतील 7 हजार 352 शेतकर्‍यांचे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना दणका बसला आहे.

यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी पाऊस व गारपिटीमुळे राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर आणि पाथर्डीला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे.

नगरसह राज्यभर गेल्या आठ दिवसांपासून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे किमान शेतकरी सतर्क झाले आणि काढणीला आलेले पिके वेगाने काढण्यात आली. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झाला. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी ते रात्रीपर्यंत ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटात दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा आणि चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. यावेळी वादळी वार्‍यामुळे पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारी मका पिक आडवे झाले आहे.

सर्वाधिक फटका बसलेली पिके

गहू, कांदा, मका, भूईमूग, हरभरा, टरबूज, चारापिके, फळपिके, आंबा, डाळींब, संत्रा, बाजारी, भाजीपाला, टोमॅटो, द्राक्षे या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

तात्काळ पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई जाहीर करा. पीकविमा दावे जलद निकालीकाढा. फळबागांसाठी विशेष आर्थिक मदत द्या. चार्‍याच्या टंचाईवर उपाययोजना करा, अशा मागण्या शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात येत आहेत.

Leave a Comment