संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूरसह परिसरात गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे चिंता निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट झाली असून रब्बी हंगामातील पिकांच नुकसान झाले आहे.
गुरूवारी सायंकाळी अचानक साकूरसह बिरेवाडी, हिवरगाव पठार, जांभुळवाडी, रणखांब, मांडवे बुद्रुक, शिंदोडी, जांबुत बुद्रुक/ खुर्द, कौठेमलकापूर, दरेवाडी, खंडेरायवाडीसह आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. तसेच जांबुत परिसरात गारपीट झाली आहे. सध्या गहू काढणी सुरू असून या पावसाचा फटाका बसला आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांवरही अवकाळी पावसाने परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले पीकांवर संकट आल्याने पठारभागातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती या नुकसानीमुळे आणखी गंभीर बनली आहे.
