नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे तिघांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या या मूळ गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असतानाच, पीडितांची बदनामी करणाऱ्या या नवीन प्रकारामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
SIT कडून दोघांना अटक, एकाचा शोध सुरु
कोपरगाव येथील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर 25 मार्च 2026 रोजी राहुल गंगाधर शिंदे याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला असता, हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव याने पाठविल्याचे समोर आले. तपासाची चक्रे पुढे फिरवल्यावर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील संदिप गर्जे याने हे व्हिडिओ योगेशला दिल्याचे स्पष्ट झाले. या साखळीचा छडा लावत पोलिसांनी राहुल शिंदे आणि योगेश आढाव या दोघांना बेड्या ठोकल्या असून, संदिप गर्जे याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 294 (2), 3 (5) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यामध्ये अनेक महिला पीडित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये आणि त्यांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये, यादृष्टीने पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशीलतेने आणि गुप्तता पाळून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
पोलीस प्रशासनाने या निमित्ताने नागरिकांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना कडक इशारा दिला आहे. कोणाकडेही अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा पीडित महिलांची ओळख पटेल असे साहित्य असल्यास ते तात्काळ नष्ट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. असे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तींसह संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पीडितांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
